Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विवाहितेचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी येथील ३३ वर्षीय महिला शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरकाम करित असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. उपचार चालू असताना दुपारी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनीषा शामकांत बाविस्कर (वय ३०, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी परिसरात मनीषा बाविस्कर या महिला आपले पती, दोन मुले, सासू, सासरे यांच्यासह श्रीरत्न कॉलनीत राहत होत्या. एस.टी. वर्कशॉप येथे त्या काम करित होत्या. तर पती शामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रीपुरा येथे देशसेवा करीत आहे. दरम्यान शनिवार २४ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी काम करीत असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.

कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णाल्यात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version