Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची तब्बल ७७ लाखांची फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाने कर्ज मंजूरीसाठी खोटे ईमेल, खोटी बँक गॅरंटीचे कागदपत्रे ई-मेलवर टाकून ती खरी असल्याचे भासवत त्यापोटी ७७ लाख ८ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगून नामदेव पौलाद पाटील (वय ५४, रा. हायवेदर्शन कॉलनी, जळगाव) यांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कौशिक भट्टाचार्य, ताराचंद बेनिवाल, रोहीत सिंग, नईम खान, अतुल शर्मा, अभिषेक श्रीवास्तव, आदित्य सिंग यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील नामदेव पाटील यांची गुरुकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून त्याच्या माध्यमातून ते बिल्डरशीप व ऑईल उत्पादक व शेती संदर्भातील व्यवसाय करतात. जून २०२१ मध्ये त्यांचे मित्र रविंद्र आत्माराम सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांची ताराचंद बेनीवाल यांच्यासह कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता यांच्यासोबत ओळख झाली. भट्टाचार्य यांनी नामदेव पाटील यांना मी अधिकृत नॉन बँकींग फायनान्स बँक गॅरंटी काढून देवून त्यावर ग्राहकांना व्यावसायीक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करतो. त्यापोटी कर्जाच्या ५ टक्के कमिशन घेतो असे सांगितले. नामदेव पाटील यांना व्यवसाय वाढीसाठी कर्जाची गरज असल्याने त्यांनी होकार दिला. त्यानुसार भट्टाचार्य याने १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी मिळवून देईल, त्याचे ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार नामदेव पाटील यांनी त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या नावे कर्जासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. काही महिन्यानंतर १० कोटी ७५ लाख रुपयांची बँक गॅरंटी ईमेलद्वारे त्यांना प्राप्त झाली. त्यावर बँक ऑफ बडोदा येथील बँक मॅनेजरचा सही शिक्का असल्यामुळे त्यांचा प्रकाश निशादराज यांच्यावर विश्वास बसला. वेळोवेळी नामदेव पाटील यांनी आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्यावर त्यांनी प्रकाश निशादराज यांना संपर्क करुन कर्जापोटी दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला. परंतू त्यांनी पुन्हा बँक गॅरंटी देण्याचे अमिष दाखवून २८ सप्टेंबर २०२१ ते १ मे २०२३ पर्यंत सुमारे ७७ लाख ८ हजार रुपये उकळले. त्यामुळे नामदेव पाटील यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी कौशिक भट्टाचार्य रा. कोलकत्ता, ताराचंद बेनिवाल रा. शनिपेठ, प्रकाश निशादराज रा. जिल्हापेठ, रोहीत सिंग रा. जिल्हापेठ यांच्यासह इतर चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Exit mobile version