Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोर्‍यात ‘बिग फाईट’ : अखेर किशोरआप्पांनी मारली बाजी !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. प्रचंड चुरस असलेल्या या निवडणुकीत अखेर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी बाजी मारली आहे.

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तीन पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात शिवसेनेतर्फे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मैदानात होते. या पॅनलला महाविकास आघाडी प्रणीत आणि माजी आमदार दिलीप वाघ तसेच शिवसेना-उबाठा पक्षाच्या वैशालीताई सूर्यवंशी यांचे तसेच भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पॅनलने आव्हान दिले होते. अर्थात येथे तिरंगी लढत रंगली होती.

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्यारोप झालेत. यात प्रामुख्याने अमोल शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झडल्या. तर माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील आरोप केले. या निवडणुकीत मतदारांची मोठ्या प्रमाणात बल्ले-बल्ले झाल्याचे दिसून आले. फुलीसाठी मोठ्या रकमेची पाकिटे वाटण्यात आल्याची चर्चा रंगली होती. विधानसभेच्या आधीची महत्वाची निवडणूक म्हणून बाजार समिती असल्याने यावर नेमके कुणाचे वर्चस्व राहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात तिन्ही पॅनलमध्ये जोरदार लढत झाली. यात विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार ? याबाबत निश्‍चीत माहिती कळत नव्हती. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास फायनल निकाल लागला. यात किशोरआप्पा पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले असून अमोल शिंदे यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. आजच्या निकालातून आमदारांनी बाजी मारल्याचे दिसत असले तरी स्पष्ट बहुमतासाठी त्यांना अजून एका जागेची आवश्यकता असून सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी अजून मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version