Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे गटाला मोठा धक्का : माजी महापौरांसह पदाधिकारी शिंदे गटात

छत्रपती संभाजी नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट पडले आहे. यात अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्या आहेत. शिवाय शिवसेनेवर दावा केल्यानंतर शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह देखील देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगरातील माजी महापौर यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उबाठा गटाचे माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बन्सीवाल यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते.

शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून ठाकरे गटातून गळती सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

Exit mobile version