Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वत:च पोटावर वार करून हल्ल्याचा केलेला बनाव उघड !

भुसावळ प्रतिनिधी | आपल्या हातानेच स्वत:च्या पोटावर वार करून आपल्यावर टोळक्याने हल्ला केल्याचा बनाव करणार्‍या कंडारी येथील युवकाचा खोटारडेपणा शहर पोलीसांनी उघड केला असून आता त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री नऊच्या सुमारास कंडारी येथील रहिवासी असणारा पवन किशोर सोनवणे (वय२४) हा युवक घायाळ अवस्थेत शहर पोलीस स्थानकात आला. आपल्यावर तीन-चार जणांनी चाकूने हल्ला केल्याने आपण जखमी झाले असल्याचे त्याने सांगितले. यामुळे शहर पोलिसांनी त्याला तातडीने ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करतांनाच पोलिसांना त्याच्या दाव्याबाबत थोडी शंका आली. कारण त्याच्या पोटावर झालेल्या जखमा या कुणाच्या हल्ल्याने झाल्याचे वाटत नव्हते. तसेच तो दारूच्या नशेत असल्याचेही डॉक्टरांना आढळून आले. तर पोलिसांनी याबाबत तपास केला असता हल्ल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली नाही.

यामुळे पोलिसांनी आज सकाळी पुन्हा पवन सोनवणे याची कसून चौकशी केली असता, त्याने आपण स्वत:च ब्लेडने पोटावर वार करून जखम करून घेतल्याची माहिती दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने आधी सुध्दा असाच प्रकार करून हातावर वार करून घेतले होते असेही या चौकशीत समोर आले असून त्या तरूणाच्या कुटुंबानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र या तरूणाने काही काळ शहर पोलिसांना वेठीस धरले. यामुळे पवन किशोर सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी शहर पोलिसांनी केली आहे.

Exit mobile version