Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हायवेच्या उपकंत्राटदार कंपनीला ७५ लाखांचा दंड !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे नशिराबाद नजीकच्या टोल नाक्यावर बोगस पावत्यांचा झोल उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे याच म्हणजे चिखली ते तरसोद या महामार्गातील टोल नाका असणार्‍या टप्प्याचे बांधकाम करणार्‍या आयुष प्रोकॉन कंपनीला तहसीलदारांनी तब्बल ७५ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. गौणखनिजाचा बेसुमार उपसा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामातील सुमारे ५० किलोमीटरच्या कामाचे उपकंत्राट हे आयुष प्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालेले आहे. वाघूर नदीच्या काठावर असणार्‍या तिघ्रे गावाच्या परिसरात सदर कंपनीने आपले युनिट उभारले आहे. या हायवेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनिज लागते. यासाठी कंपनीने भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण येथील एका शेतातून दगड,माती, मुरूम आदी काढण्यासाठीचा करार केला होता. मात्र विहीत करारापेक्षा यातून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांनी या तक्रारीवरून चौकशी करून यात आयुष प्रोकॉन कंपनीचा चूक असल्याचा ठपका ठेवत कंपनीला तब्बल ७५ लाख, ५६ हजार २८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तीन दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.

Exit mobile version