भुसावळ-सुरत पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा; १५ जूनपासून धावणार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविडमुळे बंद असलेली भुसावळ ते सुरत पॅसेंजर १५ जूनपासून आधीप्रमाणे धावणार असून या ट्रेनला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे.

कोविडच्या प्रकोप आटोक्यात आला असला तरी अनेक ट्रेन्स अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यात प्रामुख्याने भुसावळ ते देवळाली आणि भुसावळ ते मुंबई पॅसेंजर, भुसावळ ते सुरत पॅसेंजर आणि भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमिवर, दिनांक १५ जूनपासून भुसावळ ते सुरत पॅसेंजर पुर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. अर्थात, ही ट्रेन आधीप्रमाणे पॅसेंजर नसून तिला आता एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आलेला आहे.

या गाडीचा क्रमांक देखील ५९०१४ ऐवजी १९००६ व १९००५ असा असेल. थांबे मात्र पूर्वीप्रमाणे पॅसेंजर गाडीचे असतील. अर्थात, एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने याचे भाडे देखील वाढणार आहे. आधी सुरत ते भुसावळ या प्रवासासाठी ७० रूपये लागत होते. आता यासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत. या गाडीला भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, भोणे, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, सिंदखेडा, सोनशेलू, विखरण रोड, दोंडाईचा, रनाळा, टिसी, नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, नवापूर, उकई, नवा सोनगड, व्यारा, माही, बारडोली, चलथान, उधना असे थांबे आहेत.

सूरत-भुसावळ ही गाडी १३ जूनला रात्री ११.१० वाजता सूरत स्थानकातून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी सकाळी ७.५५ वाजता भुसावळात पोहोचेल. तसेच, भुसावळ-सूरत ही गाडी १५ जूनला सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सूरतला पोहोचेल. सदर ट्रेन सुरू झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Protected Content