Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टोलवाले नरमले : संजय सावकारेंनी मागे घेतले आंदोलन !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद येथील टोल नाका प्रशासनाच्या मनमानीच्या विरोधात आ. संजय सावकारे यांनी आवाज उठवून इशारा देताच त्यांनी नरमाईची भूमिका घेत तो वादग्रस्त निर्णय रद्द केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, नशिराबाद येथील टोल नाक्यावर नियमीतपणे ये-जा करणार्‍यांसाठी मासिक पासची व्यवस्था आहे. यात दिनांक १ ते महिना अखेर पर्यंत पास ग्राह्य धरला जातो. आधी महिनाभरात केव्हाही पास काढला तरी तो महिना अखेरपर्यंत चालत असे. मात्र अलीकडेच नशिराबाद टोल नाका प्रशासनाने, १ ते १० तारखेपर्यंत मासिक पास काढता येईल. नंतरच्या कोणत्याही तारखेला पास मिळणार नाही असा निर्णय घेतला होता. याच्या विरोधात आमदार संजय सावकारे यांनी टोल नाक्याने हा निर्णय आज मागे घ्यावा अन्यथा शुक्रवार दिनांक १७ जून रोजी भाजप आंदोलन करून टोलनाका बंद पाडेल असा इशारा दिला होता.

दरम्यान, आमदार संजय सावकारे यांच्या या इशार्‍यामुळे टोल प्रशासन नरमले असून त्यांनी हा निर्णय मागे घेतले आहे. यामुळे आमदार सावकारे यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याची माहिती जाहीर केली आहे. अर्थात, या निर्णयाचा मासिक पासधारक वाहनधारकांना लाभ होणार आहे.

Exit mobile version