Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह आठ जण हद्दपार

भुसावळ प्रतिनिधी | रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह त्यांचे भाऊ, मुलगा आणि साथीदार अशा आठ जणांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले होते. गेल्या आठवड्यातच खरात टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. यानंतर आता भुसावळात पुन्हा मोठी कारवाई झाली आहे.

पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षीच राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या टोळीच्या हद्दपाराचा प्रस्ताव तयार केला होता. याला आता मंजूर करण्यात आले आहे. या अनुषंगाने राजू भागवत सूर्यवंशी, दीपक भागवत सूर्यवंशी, किशोर भागवत सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, शेख इम्रान शेख गुलाम रसूल व हर्षल कैलास सोनार अशा एकूण आठ जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये सूर्यवंशी परिवारातील सहा जणांचा समावेश आहे. यात राजू सूर्यवंशी व त्यांच्या मुलासह त्यांच्या चार भावांचा समावेश आहे.

राजू सूर्यवंशी यांच्याविरुद्ध दंगा करणे, खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यारे जवळ बाळगणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग, दुखापती करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात राजू सूर्यवंशी याच्याविरुद्ध ६, दीपक सूर्यवंशीविरुद्ध २, रोहन सूर्यवंशीविरुद्ध ४, शेख इम्रान शेख गुलाम रसूल याच्यावर ३, किशोर सूर्यवंशीवर ४, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशीवर २, आनंद भागवत सूर्यवंशीवर ३, तर हर्षल कैलास सोनार याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. राजू सूर्यवंशी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांची वर्तणूक सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, खरात आणि सूर्यवंशी टोळ्यांच्या हद्दपारीनंतर आता भुसावळातील अजून काही टोळ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्‍व हादरले आहे.

Exit mobile version