वाघूर पर्यटन स्थळासाठी २५ कोटींच्या निधीची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेळगाव धरणाच्या बॅकवॉटरवर वाघूर नदी परिसरात पर्यटन स्थळ उभारण्यासाठी माजी जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी २५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली आहे.

तापी नदीवरील शेळगाव धरण पूर्णत्वाला आले असून यात यंदा जलसाठा होणार आहे. या धरणाचे बॅकवॉटर हे वाघूर नदीच्या पात्रात थेट साकेगाव जवळच्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलापर्यंत येणार आहे. यामुळे तापी-वाघूर संगमापासून ते थेट पुलापर्यंत वाघूर नदीत अथांग पाणी राहणार असून येथे पर्यटन स्थळ विकसित करावे, याला क वर्गाचा दर्जा देऊन २५ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी केली आहे.

या अनुषंगाने रवींद्र पाटील यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वाघूर पर्यटन क्षेत्राला क दर्जा देऊन यासाठी २५ कोटी रूपये मिळावे अशी मागणी केली. यावर आदिती तटकरे यांनी अनुकुलता दर्शविली असल्याची माहिती रवींद्र नाना पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिल्याची माहिती रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

Protected Content