Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात भंगारच्या गोदामांची झाडाझडती

भुसावळ bhusawal प्रतिनिधी । शहरासह परिसरातील दुचाकी चोरींच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर शहरातील भंगार गोदामांवर पोलिसांनी छापे टाकून झाडाझडती घेतली.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील १३ भंगार गोदामांवर छापे टाकले. सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात राबवलेल्या मोहिमेत ८० पोलिसांच्या १० पथकांनी २० दुचाकी, २ रिक्षांसह इतर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या मुद्देमालाच्या खरेदीची कागदपत्रे पोलिसांनी संबंधितांकडून मागवली आहेत. संबंधितांनी कागदपत्रे सादर न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहरातील खडकारोड, पापानगर, महामार्ग, खडका गावाजवळ असे एकूण १३ गोदाम पोलिसांनी तपासले. प्रत्येक गोदामात सापडलेल्या संशयास्पद मालाचा पंचनामा केला. या मुद्देमालाच्या खरेदीची कागदपत्रे पोलिसांनी संबंधित व्यावसायिकांकडून मागवली आहेत. या मोहिमेत सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, सहायक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह शहर आणि बाजारपेठचेे कर्मचारी सहभागी झाले होते.

या तपासणीत ४ बंद चारचाकी, २ रिक्षा, २० दुचाकी, २ दुचाकींचे इंजीन, ४५ इलेक्ट्रिक मोटर बॉडी, १६ दुचाकींचे सुटे भाग, ४ व्हील डीस्क, ८ पाइप, २ अ‍ॅँगल, २ लोखंडी तारेचे नवे बंडल, ३ जनरेटर, १ सीपीयू असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. यासोबत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. bhusawal, bhusawal police

Exit mobile version