Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्थिक गुन्हे शाखा करणार भुसावळच्या ‘त्या’ आजी-माजी नगरसेवकांची चौकशी

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतल्या विविध घोटाळ्यांप्रकरणी दाखल गुन्ह्यात आजी-माजी नगरसेवकांना आर्थिक गुन्हा शाखेने चौकशी करण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे. यातील बहुतांश लोकप्रतिनिधी हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे समर्थक आहेत.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ नगरपालिकेत १९९९ ते २०१४ या कालखंडात झालेल्या नऊ विविध घोटाळ्यांच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न.पा. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण पाटील (उर्फ एस. एल. पाटील) यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. यासोबत या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीसह केंद्रीय व राज्य गृह सचिवांनाही न्यायालयाच खेचले आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने गेल्या महिन्यात ईडीच्या पथकाने भुसावळ नगरपालिकेतून कागदपत्रे जमा केली होती. यातच आता जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेने संबंधीत आजी-माजी नगरसेवकांना चौकशीसाठी ४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. आज याबाबतचे पत्र संबंधीतांना मिळाले आहे. ऐन विधानसभेच्या निवडणुकीआधी होणार्‍या या चौकशीमुळे संबंधीतांचा धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधीतांना ४ तारखेला उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

जळगाव येथील घरकूल गैरव्यवहार प्रकरणी अलीकडेच मातब्बर राजकारण्यांचा झालेली शिक्षा आणि मला मोठा दंड यामुळे प्रचंड खळबळ उडालेली असतांना आता भुसावळातही हाच प्रकार घडणार का ? याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यातील बहुतांश नगरसेवक हे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटातले आहेत. तर काही जण नंतर संजय सावकारे यांच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, ही चौकशी नेमकी कशी पुढे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version