बापरे : साकेगावात तरूणींना अमानुष मारहाण : परिसर हादरला

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी | येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्‍या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात ऍट्रॉसिटीसह अन्य कलमांच्या अंतर्गत पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, साकेगाव येथे दोन मैत्रीणी रूम करून राहत असून त्या परिसरातील कॉलेजमध्ये शिकत आहेत. काल दिनांक २२ रोजी त्यांनी त्यांच्या साकेगावातील ओळखीच्या भरत चंद्रकांत मराठे या तरूणाला एटीएममध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. त्याने मदत तर केली नाहीच, पण दिवसभर फोन करून अश्‍लील भाषेत धमकावले.

यानंतर रात्री साडेनऊ वाजता भरत चंद्रकांत मराठे याच्यासह त्याचे वडील चंद्रकांत मराठे, आई छायाबाई चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री आणि शुभम (पूर्ण नाव माहित नाही) यांनी या दोन्ही युवतींना ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोलावले. तेथे त्यांना अश्‍लील आणि जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार रात्री बारा वाजेपर्यंत चालला. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

या संदर्भात संबंधीत तरूणीने तालुका पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. यानुसार चंद्रकांत मराठे, चंद्रकांत मराठे, आई छायाबाई चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री आणि शुभम (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गरनं १८०/२०२१ भादंवि कलम ३५४, ३५४-ब; ३५४-ड; ३४१; १४३; १४७; १४९; ३२३; २९४; ५०४; ५०६ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२) (व्हीए); ३ (१) (आर) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. दीपक अशोक जाधव हे करत आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी पीडित तरूणींची भेट घेऊन तपास कामाचा आढावा घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content