Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार संजय सावकारे कोरोना पॉझिटीव्ह

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

भुसावळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक उच्चपदस्थांनाही या विषाणूने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे नगरपालिकेतील आपत्कालीन सेवा वगळता दोन दिवसांसाठी कामकाज बंद करण्यात आले होते. या पाठोपाठ आता आमदार संजय सावकारे यांना देखील कोरोनाचा लागण झाली आहे. त्यांचा अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ते उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता आमदार संजय सावकारे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात गत काही दिवसांमध्ये आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. कुणीही घाबरून न जाता काळजी घ्यावी असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

जिल्ह्यात याआधी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी मंगेश चव्हाण हे नुकतेच कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत.

Exit mobile version