उर्जामंत्र्यांनी घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्याबाबतच्या तक्रारींवरून राज्याचे उर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी दीपनगर येथील आढावा बैठकीत अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दीपनगर औष्णिक केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर येथील सभागृहात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा व विद्युत निरिक्षकांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिकार्‍यांना जनतेच्या तक्रारींवरून धारेवर धरले. शेतकर्‍यांनी कृषी कनेक्शनसाठी डिमांडनोट भरली मात्र त्यांना नवीन वीज कनेक्शन का दिले नाही? वीज मिटरचा तुटवडा तर कधी पोल नसल्याचे सांगितले जाते, तुटवडा कशाचा ते आधी निश्चित करा. शेतकर्‍यांना वीज कनेक्शन देण्यासाठी नेमक्या अडचणी काय? अशी विचारणा करून नागरिकांकडून यापुढे तक्रारी येता कामा नये असे नितीन राऊत यांनी बजावले. यासोबत परिमंडळात विजेची गळती व थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याने विजेची गळती कमी करा, यासाठी विजचोर्‍या थांबवा तसेच थकबाकी वसूल करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

याप्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, ज्योत्सना विसपुते, महानिर्मितीचे प्रकल्प संचालक संजय गारुडकर, ६६० मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, ५०० बाय दोन वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, उपमुख्य अभियंता मनोहर तायडे, एन. आर. मुंडे आदींसह कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

उर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी प्रथम दीपनगर ५०० मेगावॅटच्या पीसीआर विभागाला भेट देऊन पाहणी केली. वीजनिर्मिती व कोळशाच्या साठ्याचा धावता आढावा घेतला. ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या स्टीम टर्बाइनचे लिफ्टींग कामाचा त्यांच्याहस्ते शुभारंभ झाला. यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली.

Protected Content