पक्ष सांगेल त्यालाच मतदान करणार, नाथाभाऊ आजही आदर्श ! : आ. संजय सावकारे

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे हे एकनाथराव खडसे यांना मतदान करणार असल्याची चर्चा सुरू झाली असतांना त्यांनी स्वत: या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, विधानपरिषद निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले असून यात एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीकडून तिकिट मिळाल्याने जिल्हावासियांनाही यात मोठा इंटरेस्ट येत आहे. या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे नाथाभाऊंचे समर्थक असल्याने ते त्यांना मतदान करणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त प्रकाशित होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

दरम्यान, या प्रकरणी स्वत: आमदार संजय सावकारे यांनी आज भुसावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्वत:ची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षाचा निस्सीम कार्यकर्ता असून पक्ष सांगेल त्यांनाच मी मतदान करणार आहे. मी एकनाथराव खडसे यांना मतदान करेल हा दावा कपोलकल्पीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, एकनाथराव खडसे हे आपल्यासाठी आदर्श होते, आणि यापुढेही राहणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. यामुळे या प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टपणे मांडल्याचे दिसून आले आहे.

Protected Content