भुसावळच्या माजी नगराध्यक्षांसह नगरसेवक अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह एकूण १० जणांच्या विरूध्द अपात्रतेच्या दाखल करण्यात आलेल्या अर्जावर उद्या दिनांक १७ जून रोजी सुनावणी होणार असून लवकरच निकाल अपेक्षित आहे. यात आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक रमेश देविदास भोळे यांच्यासह अन्य नऊ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडून आल्यावर देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नेमक्या याच प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका पुष्पा रमेश बतरा यांनी संबंधीत १० लोकप्रतिनिधींना अपात्र करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता.

या अर्जामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते आणि शैलजा नारखेडे यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता १९८६ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या तक्रार अर्जात करण्यात आली होती.

दरम्यान, या अर्जावर जिल्ह्याच्या न. वि. शाखेचे सहायक आयुक्त जनार्दन पवार यांच्यासमोर सुनावणी झाली. यात दिनांक १३ जून २०२२ रोजी ज्यांच्या विरूध्द अर्ज दाखल करण्यात आलाय त्या रमण देविदास भोळे आणि इतर मिळून सर्व दहा जणांनी प्रतिवादासाठी दाखल केलेली हरकत निकाली काढण्यात आली आहे. तर याच प्रकरणात अर्जदार आणि सामनेवाले या दोघांना लेखी आणि मौखीक युक्तीवाद सादर करण्यासाठी १७ जून ही तारीख देण्यात आलेली आहे. अर्थात, उद्या यावर सुनावणी होणार असून निकाल देखील लवकरच अपेक्षित आहे. यात आता नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content