Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : भुसावळात पकडला २ कोटी २७ लाखांचा गुटखा !

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन कंटेनरमध्ये भरलेला आणि तब्बल २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला असून ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, अन्य राज्यांमधून भुसावळमार्गे मोठ्या प्रमाणात गुटखा येत असतो. या आधी देखील अशा प्रकारे वाहतूक करणार्‍या गुटख्यांनी भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असली तरी हा प्रकार अद्यापही थांबलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, येथील डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी सहकार्‍यांचे एक पथक तयार केले.

सोमनाथ वाघचौरे यांनी स्वत: मिळालेल्या गुप्त माहितीवरून भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी केली. या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असलेले दिसले. या वेळी पोलिस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.

दरम्यान, तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करून जमा केले आहेत. या गुटखा नेमका कुणाचा याचा शोध सुरु आहे. भुसावळ पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून त्यांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Exit mobile version