तरूणाचा खून करणार्‍या पिता-पुत्राला कारावास

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील हिंगोणा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरूणाचा खून करणार्‍या पिता-पुत्राला भुसावळ येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे ७ सप्टेंबर २०१९ रोजी नितीन पांडुरंग बाविस्कर ( धोबी) या २८ वर्षे वयाच्या तरूणाचा खून झाला होता. नितीन याच्याशी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील व सुभाष देविदास पाटील यांचा अंगणात कचरा टाकण्यावरून वाद झाला होता. त्यात सुभाष पाटील याने घरातून लाकडी दांडा आणून संदिपच्या हातात दिला. त्याने नितीनच्या डोक्यात हा दांडा मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सदर दोन्ही आरोपींविरुद्ध फैजपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होता. भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मृताची आई गीताबाई, डॉ.नीलेश देवराज व तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. यानंतर न्यायमूर्तींची आरोपी सुभाष देवीदास पाटील याला २ वर्षे व आरोपी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील याला ७ वर्षे कारावासाच्या शिक्षेसह चार हजारांचा दंड सुनावला.

या खटल्यात सरकारतर्फे ऍड.प्रवीण भोंबे यांनी काम पाहीले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार समीना तडवी यांनी सहकार्य केले.

Protected Content