बनावट देशी दारू कारखाना : रवी ढगे याला पोलीस कोठडी

भुसावळ प्रतिनिधी | शिवपूर-कन्हाळा रोडवरील बनावट देशी दारू कारखान्याला उध्वस्त केल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख संशयित रवी ढगे याला कोपरगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील धक्कादायक आयाम समोर येण्याची शक्यता आहे.

पुणे येथील राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने शिवपूर-कन्हाळा रोडवरील बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर कारवाई केली होती. बाहेरून गणेश पावडर व कोटिंग या फर्निचरच्या गोदामाचा फलक असणार्‍या या जागेच्या मागील बाजूला बनावट देशी दारू तयार होत असल्याचे या छाप्यातून दिसून आले होते. या प्रकरणी कारखाना सुरू असलेल्या जागेचा मालक रवी ढगे याला अटक करण्यात आली. यानंतर त्यास कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे ढगेला तीन दिवसांची म्हणजेच २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात रवी ढगे याचा सहभाग असल्याची माहिती समोर येताच प्रचंड खळबळ उडाली होती. कारण ढगे हा अनेक राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये दिसून येत होता. यामुळे तो यात सहभागी असल्याची माहिती आल्याने अनेकांना धक्का बसला होता. आता त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Protected Content