Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन किलो सोने घेऊन पळालेल्या बँक मॅनेजरला ठोकल्या बेड्या !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मणप्पुरम गोल्ड या वित्तीय संस्थेतून तब्बल दोन किलो सोने घेऊन पलायन करणार्‍या मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ शहरात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घडलेल्या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली होती. यात शहरातील पांडुरंग टॉकीज भागातील मणपुरम गोल्ड बँकेतील सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून याच बँकेच्या मॅनेजरने पळ काढला होता.बँकेचे ऑडीट सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आला होता. तर याआधीच विशाल दीनानाथ रॉय ( वय २८, रा. देवरिया, उत्तरप्रदेश) या मॅनेजरने बँकेतील लॉकरमधून सुमारे दोन किलोहून अधिक सोने चोरून नेत पोबारा केला होता.

सुमारे एक कोटी रूपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या सोन्याची चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात २२ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून विशाल रॉय याच्या मागावर पोलीस होते. तो अनेक महिने हाती लागला नाही. मात्र पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो भुसावळ रेल्वे स्थानकावर येणार होता. तेव्हा सापळा रचून विशाल रॉय याला अटक करण्यात आली. ही कामगिरी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरिक्षक मंगेश गोटला, सचिन पोळ, सागर वंजारी, सुभाष साबळे, जितेंद्र राजपूत यांच्या पथकाने पार पाडली.

विशाल रॉय याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version