Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पक्षापेक्षा कुणी मोठे नाही ! : जिल्हा राष्ट्रवादीच्या नाट्यावर उपमुख्यमंत्र्यांचे थेट भाष्य

भुसावळ प्रतिनिधी | पक्षात अनेक लोक येतात अन् जातात, याचा पक्षावर काहीही परिणाम होत नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावर भाष्य केले. जि.प. सदस्य रवींद्र पाटील यांच्या निधीतून विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी ते ऑनलाईन संबोधन करतांना बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांचे समर्थक असणार्‍या पक्षाच्या १२ फ्रंटलच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी देखील तातडीने आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. खुद्द अभिषेक पाटील यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करून राजीनाम्याद्वारे पक्षाला वेठीस न धरण्याचे आवाहन केले. मात्र सोशल मीडियातून अभिषेक पाटील आणि त्यांच्या विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

आज भुसावळात कंडारी-साकेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्रनाना पाटील यांच्या निधीतून होणार्‍या विकासकामांच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथून ऑनलाईन या प्रकारात संबंधीत कार्यक्रमाला संबोधीत केले.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एका परिवारासारखा आहे. यामुळे कुणाला पदे मिळाली नाहीत म्हणून नाराज होण्याची गरज नाही. राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरणे चुकीचे आहे. पक्ष कुणासाठी थांबत नसतो. पक्षापेक्षा कुणी मोठा नसतो. आज अजित पवार मुख्यमंत्री असले तरी ते पक्षामुळे उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. ज्यांना कुणाला पदे मिळतात, त्यांनी त्या पदाची जबाबदारी देखील लक्षात घेतली पाहिजे. पक्ष कुणासाठी थांबत नाही. लोक येतात, जातात पक्ष पुढे जात असतो. दुसरी मंडळी त्यांची जबाबदारी घेत असते अश शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामानाट्यावर भाष्य केले.

Exit mobile version