Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी येथील गणपती मंदिराचे भुमिपूजन उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील साकळी येथील रेखा नगरातील श्रीगणपती मंदिराचा भूमिपूजन सोहळा महामंडलेश्ववर महंत श्री हरीजी महाराज यांचे हस्ते नुकताच पार पडला.

यावेळी फैजपूर तालुका यावल येथील सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर प.पू.महंत श्री जनार्दन हरीजी महाराज तसेच साकळी येथील हजरत रशीद बाबा, आश्रमाचे गादीपती छोटूबाबा नेवे व विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी या प्रमुख मान्यवर अतिथींच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.तत्पूर्वी येथील रहिवाशी संजय पाटील यांच्या हस्ते श्रीगणपतीची विधिवत पूजा करण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी जेडीसीसी बँकेचे माजी संचालक गणेशदादा नेहेते, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत रामजी महाजन,ज्येष्ठ नागरिक मधुकर शिंपी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विलास पाटील, विजय सूर्यभान पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील पाटील, नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले लक्ष्मण पाटील (रेलकर),ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, रामकृष्ण खेवलकर, शिरसाड येथील माजी सरपंच गोटू सोनवणे,प्रगतिशील शेतकरी श्याम महाजन,अशोक चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित संत-महंत व मान्यवर अतिथींचा रेखा-नगर भागातील रहिवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले.यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.प्रसंगी आपल्या मनोगतात प.पू.महंत जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, जिथे आपल्या मनाला शांत व धीर मिळतो ती जागा म्हणजे मंदिर होय. त्यामुळे येत्या काळात लवकरच या ठिकाणी मंदिर व मनधिर असे एकत्रित वास्तू बनणार आहे. नवीन मंदिर उभारण्यात सोबत जुन्या मंदिरांमध्ये चैतन्य निर्माण करा आणि हेच माझेही कार्य असणार आहे. महाराजांनी यावेळी श्री गणपतीच्या मंदिराचे भूमिपूजन ते मूर्तीप्राणप्रतिष्ठा होईपर्यंत गणरायाला आवाहन केले.

कार्यक्रमास गावातील अनेक भाविक-भक्त उपस्थित होते.या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे उपस्थित भाविक-भक्तांमधून मंदिर बांधकामासाठी लागणारे साहित्य व इतर रोख स्वरूपात देणगी जाहीर केली गेली. कार्यक्रमाच्या वेळी प्रामुख्याने गावातील बिजासनी ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर सोनार यांनी गणपतीची मूर्ती व ज्येष्ठ नागरिक मधुकर शिंपी यांनी मंदिराचा कळस देण्याचे घोषित केले तर  ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर यांनी वाळू व सिमेंट देण्याचे घोषित केले तसेच विजय पाटील यांनी रोख ५०००/-रक्कम देणगी दिली.त्याचप्रमाणे माजी जि.प.सदस्य वसंतराव महाजन यांनी जास्तीत जास्त देणगी देण्याचे घोषित केले.तसेच ईश्वर लोधी यांनी रोख ५०००/-, काशिनाथ सोनू बडगुजर यांनी रोख ११००/- देणगी दिली आहे . दानशूर व्यक्तींकडून देणगीचा ओघ पाहता अल्पावधीतच भाविक- भक्तांच्या सहकार्यातून मंदिर निर्माणाचे कार्य पूर्ण होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यभान बडगुजर(साकळी) यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा-नगर भागातील सर्व भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version