Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाऊसाहेब गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी यापुढेही विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवण्याची गरज असून तसेच खान्देशच्या या मातीतून शेकडो सनदी अधिकारी घडावेत अशी अपेक्षा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील गुलाबराव पाटील स्कूलमध्ये भाऊसाहेब गुलाबराव पाटील फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

Image Credit Source: Live Trends News

पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील फाऊंडेशनच्या विद्यालयात आज गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी अनंत राऊत यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, माझे स्वत:चे तसेच मुलगा आणि मुलगी यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. आमच्या काळात तर फारशा सुविधा देखील नव्हत्या. यामुळे माझ्या गावासह परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहे. दरवर्षी आमच्या यशाचा आलेख उंचावला असून पुढे देखील तो कायमच राहणार आहे. आज जीपीएस म्हणजेच गुलाबराव पाटील स्कूल हे विश्‍वासार्ह शिक्षणाचे प्रतिक बनले आहे. भविष्यात आमच्या शाळेतील कुणी विद्यार्थी कलेक्टर बनेल तेव्हा मला खरे समाधान लाभेल. गुलाबराव पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा चौफेर विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे दर्जेदार शिक्षणाच्या सोबतच आम्ही विद्यार्थ्यांना क्रीडा व अन्य क्षेत्रात पारंगत होण्यासाठी प्रेरीत करतो. यातून जबाबदारी आणि प्रगतीशील पिढी घडविण्याचे काम आम्ही करत असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला कवि अनंत राऊत यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, मी प्रतापभाऊ यांच्यामुळे आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्र वणाव्यातल्या गारव्या सारख्या या कवितेला मिळालेली उदंड लोकप्रियता ही आश्‍चर्यकारक अशीच आहे. अनेक मोठ्या राजकीय मंडळींना ही भावलेली असून सर्वसामान्यांनी तिला डोक्यावर घेतलेले आहे. आणि यासह अन्य कविता ऐकण्यासाठी झालेली गर्दी ही मला सुखावणारी आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून लांब राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर, प्रतापराव पाटील हे मोठ्या मातब्बर नेत्याचे पुत्र असून देखील ज्या प्रकारे जमीनीशी जुडलेले आहेत, ते अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी आपल्या भाषणात संस्कारांबाबत भाष्य केले. आपण बहुतांश जण हे गरीब-मध्यमवर्गातील असून आपले जीवन हे फक्त आणि फक्त शिक्षणानेच बदलू शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन अनंत राऊत यांनी केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या तुफान गाजलेल्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तसेच अन्य कविता सादर केल्या. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकटाटात दाद दिली.

295 गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार !

जळगाव धरणगाव तालुक्यातील दहावी व बारावी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीया आलेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत व मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आला यात दहावीच्या 212 तर बारावीच्या 83 अश्या 295 विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश होता. या भव्य दिव्य व प्रेरणादायी कार्यक्रमामुळे भविष्यात याचा आम्हाला फायदा होईल असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

या गुणगौरव सोहळया प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनावणे, प्रतापराव पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील, सचिन पवार , दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, डॉ. कमलाकर पाटील, भरत बोरसे, मोतीलाल पाटील, मुकेश सोनवणे, मच्छिंद्र पाटील, अनिल भोळे, जितेंद्र नारखेडे, भूषण पाटील, शाळेचे चेअरमन विक्रांत पाटील, यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी व जळगाव व धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात हायस्कुलचे मार्गदर्शक व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी संस्थेची व शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विषद केली . सूत्रसंचालन निवेदिका मंजुषा आडगावकर व प्राचार्य सचिन पटीन यांनी केले तर आभार योगेश सोनवणे यांनी मानले.

Exit mobile version