Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भगवत चिंतनाने हृदयात प्रसन्नता निर्माण होते- आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जीवाचं शिवाशी मिलन म्हणजेच कथा आणि भक्ती होय. कथा श्रवणाने मनुष्याच्या जीवनाला आकार प्राप्त होतो असे सूत्र कोथळी येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी निरुपण करताना सांगितले.

 

कोथळी येथे आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सतपंथ परिवारातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहात आजच्या द्वितीय दिवशी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी भागवत कथेचे निरुपण केले. यावेळी श्रीमद् भागवतातील गोकर्ण व धुनधु:कारीच्या कथेतील काही सुंदर प्रसंगाचे सुश्राव्य वर्णन करून भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा सुंदर विस्तार महाराजांनी केला.

माणसाने शास्त्रात सांगितलं ते ऐकावे, वेदांनी सांगितलं ते बोलावे आणि संतांनी सांगितलं तिकडे चालावे तरच माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकते. असे भागवतातील सार त्यांनी सोप्या शब्दात उपस्थितांना सांगितले.

यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्यासह संत मंडळी व जेष्ठ श्रेष्ठ श्रद्धावान उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते व्यासपीठावर जेडीसीसी बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या रोहिणीताई खडसे खेलवरकर, चिनावल येथील भजनी मंडळ, ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, श्रीकांत रत्नपारखी जळगाव आदींचा आदिशक्ती मुक्ताई यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या भागवत कथा व किर्तन सप्ताहासाठी महाराष्ट्रातून अनेक संत महंत तथा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेत आहे.

Exit mobile version