Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भादली हत्याकांड : अनसॉल्व्हड मर्डर मिस्ट्री !

Asoda Kand

जळगाव : विजय वाघमारे 

 

मागील काही वर्षांपासून सोनी टीव्हीवर भारतातील खऱ्या गुन्ह्यांचा तपास चतुराईने करणाऱ्या पोलीसांच्या सत्य कथा दाखवल्या जात आहेत. ‘क्राईम पेट्रोल’ नावाच्या ही मालिका सोनी टीव्हीवर दिवसभर जुने-नवे भाग दाखविले जात असतात. सांगायचा उद्देश एवढाच की, ही मालिका पहिल्यानंतर प्रत्येक खुनाचा उलगडा होतो आणि पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतोच! ही धारणा मन आणि मेंदू मान्य करतो. त्यामुळे भादली येथील भोळे कुटुंबातील चार सदस्यांचा खून करणारे मारेकरी दोन वर्षानंतरही सापडू शकत नाही, हे मान्य करणे जरा अवघड ठरते. कारण भारतातील अनेक जटिल व गुंतागुंतीच्या हत्याकांडांचा अतिशय शिताफीने पोलीस शोध घेऊ शकतात, हे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. या हत्याकांडात पोलिसांनी दोन संशयितांना पकडले होते. परंतु दोषारोपपत्र अभावी त्यांना जामीन मिळाय. नार्कोटेस्टची परवानगी न्यायालयाने न दिल्याने मुख्य सूत्रधार अजूनही कायद्याच्या कचाट्यापासून लांबच आहे. त्यामुळे हत्याकांडाचे खरे सूत्रधार उद्या सापडले तरी गुन्हा सिद्ध कसा करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

 

आरुषी तलवार आणि भोळे परिवार हत्याकांडातील साम्य

 

आरुषी तलवार आणि जळगाव जिल्ह्यातील भादली भोळे परिवार हत्याकांडात अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळते. विशेष म्हणजे या दोन्ही हत्याकांडात स्थानिक पोलिसांनी प्राथमिक तपास व्यवस्थित न केल्यामुळे याप्रकरणांचा गुंता वाढला, हे उघड सत्य आहे. कोणत्याही खुनाच्या गुन्ह्यात सुरुवातीचे काही तास हे तपासाच्यादृष्टीने फार महत्वपूर्ण असतात. कारण काही तासांनंतर घटनास्थळी असलेले परिस्थितीजन्य पुरावे हळूहळू नष्ट व्हायला लागतात. तसेच आरोपीला बचावासाठी एक वेगेळी थेअरी तयार करायला वेळ मिळतो. नेमके हेच आरुषी तलवार आणि भोळे परिवार हत्याकांडात घडले आहे. आरुषी हत्याकांडप्रमाणे भादली प्रकरणात देखील आरोपी पोलिसांच्या नजरे समोर होतेच. परंतु पहिल्या काही तासात उडालेला गोंधळ सर्व तपासाचा खिचडी करून गेला आणि आता तर वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय.

 

 

आरुषी तलावर हत्याकांडात मीडिया ट्रायलमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्थानिक पोलीसांवर प्रचंड दबाव होता. त्यातून तपास भलताच भरकटला. आज आरुषीच्या आई-वडिलांना याप्रकरणी शिक्षा झालेली असली तरी, या खुनाचा तपास योग्यरित्या झाला नाही किंवा तलवार दाम्पत्य निर्दोष असल्याचे अनेक तर्क आजही जिवंत आहेत. सुरुवातीला आरुषीच्या हत्याकांडात एकाच घरात अवघ्या काही अंतरावर झोपलेल्या आई-वडिलांना आरुषीचा आवाज येऊ नये, हे जरा अवघडच वाटायचे. परंतु सीबीआयने केलेल्या तपासात एसीच्या आवाजामुळे तलवार दाम्पत्याला आरुषीच्या हत्याकांडाचा आवाज आला नसल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाले होते. हत्येनंतर आरुषीचे गुप्तांग स्वच्छ करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तर या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळाली होती.

 

 

अशाच पद्धतीचे चकित करणारी तथ्य भादली हत्याकांडातही समोर आली आहेत. लाकडी फटीचे घर असून देखील शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना चार जणांचा खून झाल्यानंतरही कुणाचाही आवाज येऊ नये. तसेच तीन महिन्यांपासून दारू सोडलेली असतानाही मृत्यूपूर्वी मयत प्रदीपने अचानक अतिमद्यसेवन करणे, गावातीलच महिला व तिच्या विवाहित मुलीशी सतत बोलणे, यागोष्टी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.परंतु पोलीस आजही निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

 

पोलीस तपासाची झालेली खिचडी

 

२० मार्च २०१७ रोजी पहाटे भोळे परिवार हत्याकांड घडल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जे.डी.सुपेकर व एलसीबीच्या टीमने प्राॅपर पद्धतीने तपास करायला सुरुवात केली होती. परंतु अन्य एका अधिकाऱ्याने एकाचवेळी अनेक पोलीस अधिकारी,कर्मचारींना कामाला लावले प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तपास करू लागला,पुरावे तपासू लागला. त्यामुळे पोलीस तपासाची पूर्ण खिचडी झाली. अर्थात त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने थोडा इगो आणि शहाणपण बाजूला ठेवले असते तर कदाचित आज या हत्याकांडातील मारेकरी सबजेलमध्ये राहिले असते. अनेक गुंतागुंतीच्या खून प्रकरणांचा उलगडा करणारे चतुर पोलीस असल्याची साक्ष क्राईल पेट्रोल या मालिकेतून रोज दिली जात असते. जळगाव पोलिसांनी देखील डॉ.सोनवणे खून प्रकरण, दागिना कॉर्नर दरोडा एवढेच नव्हे तर सिमीच्या दहशतवाद्यांना भारतात पहिल्यांदा शिक्षा पोहचवणे,अशा प्रकरणातून आतापर्यंत पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशीच कामगिरी राहिली आहे. अनेक जटील गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावलेला असतांना भादली हत्याकांडात मात्र, जळगाव पोलीस का हतबल झाले असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडलाय.

 

काय आहे भादली हत्याकांड?

 

जळगावजवळील भादली गावात एकाच कुटुंबातील चौघा जणांची हत्या केल्याची घटना २० मार्च २०१७ रोजी पहाटे उघडकीस आली होती. मृतांमध्ये पती,पत्नी आणि दोन मुलांचा समावेश असून सामूहिक हत्याकांडाच्या घटनेने खानदेशात प्रचंड खळबळ उडाली होती. भादली गावातील भोळेवाडा येथे एका छोट्याशा घरात प्रदीप भोळे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. भोळे कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांची जमीन नुकतीच त्यांनी साडे पाच लाख रुपयांत विकली. या पैशातून ते हॉटेलचा व्यवसाय सुरू करणार होते. सोमवारी त्यांच्या हॉटेलचा शुभारंभ होणार होता. मात्र रविवारी रात्री कुटुंबातील सदस्यांची कर्त्या पुरुषासह अज्ञात व्यक्तींनी डोक्यात लाकडी दांडक्यांनी हत्या निर्घुणपणे वार करून केली. मयतांमध्ये प्रदीप भोळे (४५) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगिता (३५) मुलगी दिव्या (८) आणि मुलगा चेतन(५) यांचा मृतांमध्ये समावेश होता.

 

बाई,बाटली आणि संपत्ती आणि खुनाचे रहस्य

 

एखादा गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत असतांना पोलिसांचे काही ढोबळ अंदाज असतात. बाई,बाटली आणि संपत्ती या तीन गोष्टींच्या अवतीभवतीच जवळपास प्रत्येक खुनाचे रहस्य दडलेले असते. भादली सारख्या कोणत्याही निर्घृण हत्याकांडात आणखी एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे खून करणाऱ्याच्या मनात समोरील व्यक्तीविषयी टोकाचा आणि भयंकर राग असतो. त्यातूनच क्रूररित्या कुणाला तरी संपवले जाते. अशा पद्धतीचा राग हा संपत्ती किंवा फक्त अनैतिक संबंधातूनच मानवी मनात निर्माण होत असतो.

 

तपासाबाबत ओव्हर कॉन्फिडन्स

 

न्यायालयात ग्राह्य ठरेल, अशा प्रकारचा पुरावा गोळा करणे. यासाठी तपासणी अधिकारी सर्वसाधारण शिक्षण, पोलिस कामगिरीचे प्रशिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींत तरबेज असावा लागतो. गुन्हा तपासणी हे शास्त्र आहे; तशीच ती एक कलाही आहे. अशी कला अवगत असलेला अधिकारीच गुन्ह्यांचा छडा लावू शकतो. भादली प्रकरणात मात्र,याच गोष्टींची नेमकी कमतरता बघायला मिळाली. एका पोलीस अधिकाऱ्यांचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ भादली हत्याकांडाच्या तपासात नडला. चार-चार खून झालेत, आजूबाजूला दाटवस्ती, बोटाचे ठसे,कॉल रेकार्ड, अमुक-ढमुक त्यामुळे आरोपी वाचूच शकणार नाही, अशा अतिआत्मविश्वासानेच या हत्याकांडाचा तपास भरकटला आणि तथ्य नष्ट होण्यास वेळ मिळाला. वास्तव नाही, परंतु एखादं जुना हवालदार देखील हा गुंता सहज सोडवू शकला असता. परंतु जे व्हायला नको, तेच भादलीत झाले.

 

प्राथमिक तपासातील तृटी आणि वैज्ञानिक तंत्राकडे दुर्लक्ष

 

जगातील प्रत्येक व्यक्तीचे किंबहुना प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य असते. तसेच कोणत्याही दोन व्यक्ती अथवा वस्तू परस्परसान्निध्यात राहिल्यास त्या सान्निध्याचीही चिन्हे त्यांच्यावर उमटतात. या दोन प्रमुख नियमांवरच प्राधान्याने गुन्हातपासणीस उपयुक्त ठरणारे वैज्ञानिक तंत्र अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीच्या बोटांच्या ठसे इतके भिन्न स्वरूपाचे असतात, की कोणत्याही दोन व्यक्तींचे ठसे तंतोतंत कधीच सारखे असू शकत नाहीत. कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगाचा वास सारखा असत नाही. यामुळे कुत्रे सुलभतेने वासावरून गुन्हेगारांचा माग काढू शकते. अंगाचा वास त्या-त्या व्यक्तीच्या नित्योपयोगी कपड्यांना व वस्तूंनाही येत असतो. त्यामुळे गुन्हेगाराची चुकून मागे राहिलेली वस्तू किंवा त्यांच्या पावलांचे ठशांच्या वासावरून देखील माग काढण्यास पोलिसांना सोपे जाते. परंतु भादली प्रकरणात मात्र, सुरुवातीच्या काळात याबाबत फार गांभीर्याने घेतले गेले नाही. अन्यथा घरात कुठेतरी मारेकऱ्यांचे अस्तित्वाचे पुरावे समोर आले असते आणि संशियीतांशी ते वैज्ञानिक तंत्रज्ञातून जुळवता देखील आले असते.

 

संशयित सापडले तरी गुन्हा सिद्ध कसा करणार?

 

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार मयत प्रदीप भोळे व मारेकऱ्यांमध्ये झटापट झालेली आहे. त्यामुळे एका छोट्याशा खोलीतील आरोपींचे अस्तित्वाचे पुरावे आजच्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उघड होणार नाहीत, हे जरा अशक्यप्राय वाटते. यावरून हत्याकांड उघडकीस आल्याच्या काही तासांनंतर वैज्ञानिक तपासण्या व्यवस्थित झाल्या नसाव्यात, असे म्हणण्यास वाव आहे. खून करण्याची पद्धत लक्षात घेता, अगदी ग्रामीण भागात हाणामारी किंवा चोरीच्या उद्देशाने खून होतात,त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडले आहे. गुन्ह्याच्या स्थळाचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे, साक्षीदारांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस कशी करावी करावी, यांविषयी काही नियम-पद्धती पोलिसांकडून याठिकाणी व्यवस्थित पाळण्यात आल्या नसाव्यात. अन्यथा एका छोट्या गावात एवढे मोठे हत्याकांड घडेल आणि कुणीही काहीच पहिले किंवा ऐकले नसेल असे शक्यच नाही. भादली प्रकरणात अनेक साक्षीदारांनी भीतीपोटी जबाब फिरविले आहेत. अर्थात खुनासारख्या प्रकरणात कित्येक संशयित किंवा साक्षीदार केवळ भीतीने वा अन्य काही कारणांनी कबुलीजबाब देऊन मोकळे होतात.त्यामुळे जबाब घेतांना सावधगिरी बाळगायला हवी होती. खरं म्हणजे भादली प्रकरणात खबऱ्यांचे जाळे देखील कमी पडले, हे वास्तव देखील कुणीही नाकारू शकत नाही. आजच्या घडीला तर भादली प्रकरणाचा पार चोथा झालाय. त्यामुळे उद्या आरोपी सापडले तरी त्यांना शिक्षा होईल याची शाश्वती कुणीही देऊ शकणार नाही.

Exit mobile version