नवरदेवासह पोलिसांवर हल्ला : चौघे अटकेत

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुलीच्या आंतरजातीय विवाहानंतर तिच्या पतीसह पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आरती बर्डे (रा.बोराडी, ता. चिखली, जि.बुलडाणा) हिचा विवाह ६ जूनला भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे समाधान विनायक पाटील याच्याशी होणार होता. मात्र, जातीबाहेर विवाह होत असल्याचे कारण पुढे करून गावातील एका गटाने हळदीच्या कार्यक्रमात हल्ला केला. समाधान पाटील हा आपल्या जातीच्या मुलीशी लग्न करत असल्याचा राग येऊन सुखदेव सोनवणे (रा.देव्हारी, ता.भडगाव) याने इतरांच्या मदतीने नवरदेव समाधान पाटील यांच्यावर हल्ला केला. यात नवरदेवावर कुर्‍हाडीने वार करून विवाहस्थळी नासधूस केली. तर ही माहिती मिळताच तेथे आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

या प्रकारानंतर नवरी मुलगी आरती बर्डे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत २० ते २५ जणांविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी सुखदेव देवराम सोनवणे, समाधान देवराम सोनवणे, दिलीप रतन गायकवाड (रा.सर्व देव्हारी) व रोहिदास लक्ष्मण भील (रा.बोदर्डे) यांना अटक केली आहे. दरम्यान, जमावातील इतरांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सी.बी.पालकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content