Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान व धान्याचे तातडीने वाटप होणार; मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून  अतिवृष्टी झाली. या पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करण्याचे आणि नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंत्री अनिल पाटील यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, शेतपिकांचे नुकसान झालेच शिवाय शेतजमिनी देखील खरडून गेल्या, त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा. तातडीची मदत म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार सानुग्रह अनुदान व धान्य दोन दिवसात वाटप करण्याचे आणि धान्य देत असताना धान्यासोबत अन्य आवश्यक खाद्य पदार्थाची किट सामाजिक संस्थांच्या मदतीने द्यावी, असे पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version