Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी विभागातर्फे विविध योजनांतर्गत ४७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा कृषी अधीक्षक विभागातर्फे राज्य व केंद्र शासनांतर्गत पोखरा, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सिंचन, ठिबक सिंचन आदी योजनाद्वारे जिल्ह्यातील सुमारे ४७ हजार ४४३ शेतकऱ्याना लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.

जिल्ह्यात दरवर्षी कृषी यांत्रिकीकरण औजारे, आधुनिकीकरण अंतर्गत शेतीसिंचनासाठी ठिबक सिंचन संच, पाईप यासह अन्य गरजेच्या वस्तू गरजू पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे अनुदानाच्या माध्यमातून तसेच डीबीटी योजनेद्वारा देखील लाभ देण्यात येतो. त्यानुसार २०२१-२२ अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोकरा योजनांतर्गत सुमारे ४७ हजार ४४३ शेतकऱ्याना लाभ देण्यात आला आहे.

यात सर्वात जास्त २८ हजार २३३ लाभार्थ्यांना ठिबक सिंचनद्वारे १९ कोटी ३९ लाख ५६ हजार १०० रुपये अनुदान स्वरुपात वितरीत करण्यात आले आहेत. तर शेडनेट १७४, जलवाहिनी पीव्हीसी पाईप, कृषी पंप, रोपवाटिका, तुषार सिंचन, बीज प्रक्रिया, नाडेप तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत कडधान्य, भरडधान्य, कापूस, केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य तसेच राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण यात ६८७४ लाभार्थ्यांचा समावेश असून त्यांना २४ लाख ७१ हजार रुपये अनुदान स्वरुपात लाभ देण्यात आला असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version