Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी विविध संघटनांतर्फे घंटानाद आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांवरील होमगार्ड जवानांना देखील बंदोबस्तात समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व विविध संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे तत्कालीन होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांनी कोरोना काळात ५० वर्षाच्या पुढील होमगार्ड स्त्री-पुरुष जवानांना बंदोबस्त देऊ नये असे अन्यायकारक आदेश काढलेले आहेत. वास्तविक कोरोनाची बाधा कोणतेही वय पाहून होत नाही. तसे असते तर अनेक बालके, तरुणांना कोरोनाची बाधा झाली नसती. तसेच अनेक शासकीय कार्यालयांमधील तसेच पोलीस विभागातील ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन त्यांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे कोरोना हा पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांना होऊ शकतो असा निव्वळ अंदाज बांधून त्यांना बंदोबस्त पासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच ५० वर्ष उलटलेल्या महिला पुरुष होमगार्ड जवानांची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात आली होती. यामुळे शारीरिक क्षमता चांगली असूनही केवळ ५० वर्षांचे वय उलटली याचे कारण सांगून त्यांना बंदोबस्त पासून दूर ठेवणे अन्यायकारक आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक शहराध्यक्ष निलेश बोरा, संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, महाराष्ट्र स्टूडेंट युनियनचे अॅड. अभिजीत रंधे, मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष ‌ फिरोज शेख यांनी सहभाग घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

Exit mobile version