Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वंशाचा दिवा होवून लेकीने बापाला दिला अग्निडाग

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह सुरु होता. यातच घरातील कर्त्यालाच कोरोनाची लागण झाली. उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. अग्निडाग देण्यासाठी मुलगा नसल्याने त्या मयताचा मुलगीने पुढे येत आपल्या पित्याला अग्निडाग दिल्याचा प्रकार बुधवारी रात्री नेरीनाका स्मशानभूमीत अनेकांनी अनुभवला. हा संपुर्ण प्रकार बघून अनेकांच्या डोळे पाणावले होते.

शहरातील रिधूर वाड्यातील रहिवासी दिनकर रामदास सोनवणे हे ममुराबाद-इदगाव मार्गे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांना तीन मुली असून त्या सर्वांचा विवाह झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर इकरा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. परंतु तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती कळताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर नगरसेवक मुकूंदा सोनवणेंनी कायदेशीर प्रक्रिया केली. त्यानंतर मृतदेह सायंकाळी नेरीनाका स्मशानभूमीत दाखल केला.

नेरीनाका स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजेनंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात नाही. परंतु नगरसेवक मुकूंदा सोनवणे यांनी पुढकार घेत कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबात अग्निडाग देण्यासाठी कोणीच नाही, त्यांची मुलगी अग्निडाग देत आहे असे सांगत स्मशानभूमीतील कर्मचार्‍यांना अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. यावर त्या कर्मचार्‍यांनी देखील तात्काळ होकार देेत रात्री १० वाजता अंत्संस्कार करण्यासाठी होकार दिला. 

अंत्यसंस्काराची तयारी झाल्यानंतर दिनकर सोनवणे यांची द्वितीय मुलगी राणी ही पुढे सरसावली. दरम्यान मनपा कर्मचारी धनराज सपकाळे, शरीफ पिंजारी यांच्यासह सोनवणे यांची मुलगी राणीने पीपीई किट परिधार करुन सर्व अंत्यसंस्काराच्या धार्मिक विधी पूर्ण करीत आपल्या पित्याला अग्निडाग दिला. हा संपुर्ण प्रकार बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

 

Exit mobile version