दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरूणास मारहाण

पहूर , ता जामनेर (वार्ताहर) दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणास  मारहाण करण्यात   आली असून याच्या निषेधार्थ महिलांनी थेट पहूर येथील पोलीस ठाण्यात धाव घेत भारुडखेडा येथे शंभर टक्के दारूबंदीची मागणी केली आहे .

याबाबत माहिती अशी कि पहूर पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या भारुडखेडा येथे  दारूबंदीसाठी ग्राम सुरक्षा दलाच्या सहकार्याने  सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत . त्याला बऱ्याच अंशी यशही आले आहे . मात्र काही प्रमाणात सुरु असलेली दारू पूर्णपणे बंद करावी ,यासाठी पुढाकार घेतलेल्या वैभव मंगलसिंग राजपूत या तरुणाला गावातीलच काही लोकांनी मारहाण केल्याची घटना काल सोमवारी रात्री ८ -३० वाजेच्या  सुमारास घडली .या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज मंगळवारी थेट पहूर पोलिस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांना पूर्णतः दारूबंदी करण्याची मागणी केली . वैभव राजपूत यांनी दिलेल्या निवेदनानुसार  मारहाण करणाऱ्यां विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे .

भारुडखेड्याची वाटचाल दारूबंदी कडे होत असतानाच काही प्रमाणात सुरू असलेली दारू बंद व्हावी , यासाठी प्रयत्न करणाऱ्या वैभव मंगलसिंग राजपूत या तरुणाला गावातीलच काही लोकांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली . यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या . वैभव राजपूत यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत त्यांनी पहूर पोलिस ठाण्यात येऊन १००% दारूबंदीची मागणी केली .यावेळी उपसरपंच रेखा गोसावी ,द्वारका गोसावी ,उज्वला गोसावी , नंदा गोसावी ,अरूणा वाघ ,कल्‍पना शिंदे , वैभव राजपूत ,गब्बर वाघ , सचिन शर्मा या  स्थानिक रहिवाश्यांसह माजी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे उपस्थित होते .

याबाबत बोलतांना राकेशसिंह परदेशी म्हणाले कि भारुडखेडा सारख्या ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दलाच्या सहकार्याने दारूबंदीसाठी यशस्वी प्रयत्न होत आहेत .काही प्रमाणात सुरू असलेली दारूविक्रीही येत्या काळात स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .दारूबंदीचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकांच्या  पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी – अधिकारी सोबत आहोत .कोणत्याही धमकीला त्यांनी बळी पडू नये .संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईड करण्यात येईल

Protected Content