Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांवरून महिलेच्या पतीला मारहाण तर मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेच्या पतीला उधारीच्या पैशांवरून दोन जणांनी बेदम मारहाण केली तर तिच्या १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात महिला ही पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. महिलेच्या पतीने रणजीत जिजाबराव इंगळे यांच्याकडून उधारीने पैसे घेऊन दूध वाल्याला दिले होते. उधारीने घेतले पैसे परत करण्यासाठी इंगळे यांनी तगादा लावला होता. याबाबत दोन ते तीन वेळा वाद देखील झाला होता. दरम्यान मंगळवार २१ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रणजीत जिजाबराव इंगळे व त्याची पत्नी रंजना इंगळे हे दोघे घरी आले. त्यावेळी महिलेचा पती झोपलेले होते आणि दोन्ही मुले घरात होती. रणजीत इंगळे व रंजना इंगळे यांनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली तर १० वर्षाच्या मुलीचा विनयभंग करून दोन्ही मुलांना मारहाण केली. पीडित मुलीच्या आईने सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रणजीत जिजाबराव इंगळे आणि रंजना रंजीत इंगळे यांच्याविरोधात रात्री १० वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोदवडे करीत आहे.

 

Exit mobile version