Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही – मुख्यमंत्री फडणवीस

News 11

मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीची औपचारिक घोषणा केली आहे. युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ असा सूचक इशारा यावेळी दिला आहे. तसेच मुख्यमत्र्यांनी महायुतीचा फॉर्म्युला देखील जाहीर केला. त्याप्रमाणे भाजप 150, शिवसेना 124 तर मित्रपक्ष 14 जागांवर लढणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरुन तिढा असेल मात्र हिंदूत्वाचा धागा भाजप-शिवसेनेला जोडणारा आहे. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र युती होणार यावर आमच्या मनात कुठलीच शंका नव्हती. लोकसभेनंतर विधानसभेत आम्ही सोबत युतीत राहावं ही आधी जनतेची इच्छा होती. युतीत काही वाटाघाटी कराव्या लागतात त्या आम्ही केल्या आहेत. विधानसभेत महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलताना आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं, काही गोष्टी बसून ठरवायच्या असतात असं मत व्यक्त केलं. तर लहान भाऊ-मोठा भाऊ या चर्चे पेक्षा टिकवून एकत्र पुढे जात आहेत याचं समाधान असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ असा सूचक इशारा दिला आहे. राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे, मात्र पुढच्या दोन दिवसात या सगळ्यांना अर्ज मागे घ्यायला सांगणार आहोत. जो उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी ऐकणार नाही त्यांना युतीत कुठलंही स्थान मिळणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिला आहे.

Exit mobile version