Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘बनाना टी’ झालीय लोकप्रिय : बनविण्याच्या पध्दतीसह जाणून घ्या सर्व फायदे ! ( व्हिडीओ )

banana tea

केळ्यांपासून कुणी चहा तयार करू शकेल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, आता ‘बनाना टी’ लोकप्रिय होत असून उत्तम स्वाद व यातील पोषक तत्वांमुळे लोकांची याला पसंती मिळू लागली आहे.

प्रचलन वाढले

केळी हे फळ जगभरात लोकप्रिय आहे. याची चव सर्वांना भावणारी असून यात पोषक तत्वे असल्यामुळे जगभरात केळी लोकप्रिय आहेत. याला फक्त फळ म्हणूनच नव्हे तर विविध खाद्य प्रकारांमध्ये वापरले जाते. यात आता नवीन प्रकाराची भर पडली आहे. आता पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये ‘बनाना टी’ अर्थात केळीयुक्त चहा प्रचलीत होतांना दिसून येत आहे.

तयार करण्याची पध्दत

‘बनाना टी’ दोन प्रकारांमध्ये तयार करता येतो. यातील पहिल्या प्रकारात पिकलेल्या केळ्याची साल काढून याला पाण्यात उकळण्यात येते. यामुळे केळातील अर्क पाण्यात उतरतो. तर दुसर्‍या प्रकारात सालीसह केळी पाण्यात उकळण्यात येते. या दोन्ही प्रक्रियांमध्ये सारखाच लाभ होत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार पध्दत वापरल्यास उत्तम. यानंतर त्या पाण्यात मध वा दालचिनी टाकून याला सेवन करता येईल. अन्यथा यात आवडीनुसार ग्रीन अथवा ब्लॅक टी (चहापत्ती) टाकून चहा तयार करता येईल. या प्रकारे तयार केलेला चहा हा चवीसाठी उत्तम असून यात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात.

सेवन करण्याचे लाभ

‘बनाना टी’ नियमितपणे सेवन केल्यामुळे अनेक लाभ मिळत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. या चहामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज आणि व्हिटॅमीन बी ६ हे पोषक तत्वे मिळतात. तसेच यात पाण्यात विरघळणारे अँटीऑक्सीडंट तत्वदेखील मोठ्या प्रमाणात असतात. यातील बी ६ जीवनसत्वांमुळे उत्तम पचन प्रक्रिया, लाल पेशींच्या निर्मितीस सहाय्य आदींचा लाभ होतो. तर अँटी ऑक्सीडंट तत्वांमुळे ही चहा निरोगी हृदयासाठी उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या चहाचे नियमित सेवन करणार्‍यांना गाठ निद्रा येत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. यामुळे निद्रानाश वा निद्रेशी संबंधीत अन्य विकार असणार्‍यांसाठी ही चहा वरदान ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर या चहामध्ये साखरेचा समावेश नसल्यामुळे मधुमेही अथवा शर्करेच्या वापराबाबत सजग असणार्‍यांना ही चहा उपयुक्त ठरणारी आहे.

पहा : ‘बनाना टी’ तयार करण्याची प्रक्रिया दर्शविणारा व्हिडीओ.

Exit mobile version