Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीर फाईल्सवर बंदी आणा : अब्दुल्ला

श्रीनगर वृत्तसंस्था | काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर काश्मिर फाईल्स चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केली आहे.

 

काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं आहे. राहुल भट या तरुणाच्या हत्येनंतर सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी वेगळीच मागणी केली आहे. ’काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी,’ अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे.

या संदर्भात फारूक अब्दुल्ला म्हणाले की, ’काश्मीर फाईल्स हा सिनेमा सत्यावर आधारित आहे का, असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरंच एखादा मुस्लीम आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचं रक्त भातात टाकून तो भात पत्नीला खायला देईल का? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?’ असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

 

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्स या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. केंद्रात सत्तेत असणार्‍या भाजपने या सिनेमाचं जोरदार समर्थन केलं होतं. यानंतर  आता फारूख अब्दुल्ला यांनी बंदी घालण्याची मागणी केल्याने यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version