Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बारा गाडयांसह एकात्मतेचे प्रतिक बालाजी रथोत्सव यात्रा उत्साहात संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला आणि सुमारे ११७ वर्षांची परंपरा असलेला बालाजी महाराजांचा रथोत्सव व यात्रा यावल येथे उत्साहात संपन्न झाला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्ष रथोत्सव साजरा होऊ न शकल्यामुळे या वर्षी रथोत्सवासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. हरिता सरीता नदीच्या पात्रात भाविकांच्या उपस्थितीत चोपडा मार्गावरील खंडेराव महाराजांच्या बारागाडया ओढल्या गेल्यात. त्या नंतर रथोत्सवाच्या मिरवणुकीस सुरूवात झाली.

रथोत्सवाचे स्वरूप –

सुमारे १९०५ मध्ये येथे शहरात श्री. हळबे यांनी रथोत्सवास सुरवात केल्याची आख्यायिका आहे. १९०५ मध्ये रामजी मिस्त्री यांनी तयार करण्यात आलेल्या नक्षीदार कोरीव काम असलेल्या रथाचे १९७७ मध्ये रामजी मिस्त्रीच्या मुलांमार्फत पुनर्नुतनिकरण करण्यात आले. हा रथ संपूर्ण सागवानी लाकडाचा कोरीव नक्षीदार काम असलेला रथ उत्कृष्ट कामगिरीचा अप्रतिम नमुना असून  २२ फूट उंच असून १८ टन वजनाचा आहे. त्याची चारही चाके बाभळच्या लाकडाची आहेत. रथावर बालाजी महाराजांची मूर्ती असते. याशिवाय दोन अश्व, त्यांना हाकणारा सारथी, दोन्ही बाजूला दोन देवतांच्या मूर्त्या आहेत. रथाचे उंच मनोऱ्यावर हनुमान मूर्ति आरूढ आहे.

रथोत्सवाचे मार्गक्रमण –

आज शनिवार, दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील महर्षी व्यास मंदिराजवळ प्रगतीशील शेतकरी अभय फेगडे यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हरीता नदीपात्रात खंडेरायाच्या बारागाडया ओढून झाल्यावर बालाजी महाराजांचा रथ शहरात मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण करीत निघाले.

मोगरी लावण्याची परंपरा –

अनेक भाविकांच्या मदतीने शहरात प्रमुख मार्गाने ओढला जाणारा रथ मुख्य रस्त्यावर येतांना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम रथाच्या चाकांना मोगरी लावणारा करतो. ही मोगरी लावण्याची परंपरा रामजी मिस्त्री यांच्या वंशजानंतर गंगाधर दांडेकर, बाबूराव सोनार, हरी मिस्त्री, अशोक लोहार यांचे सह सुतार लोहार घराण्यातील परंपरा आहे. सध्या दिलीप मिस्त्री, अशोक मिस्त्री, किशोर दांडेकर हे समर्थपणे सांभाळत आहेत.

पारंपारीक वेशातील भालदार, चोपदार –

विशेष पारंपारीक वेशात असलेले भालदार व चोपदार भाविकांना रथ शहराच्या मुख्य रस्त्यावर आला असल्याची सूचना देतात. गल्लीबोळात फिरुन बालाजींच्या दर्शनासाठी “आरती घेऊन चला..” अशी हाक देत ते फिरत असतात. पूर्वी ही जबाबदारी ज्योतीबा कदम पार पाडीत होते. आता ही जबाबदारी शिवाजी गणपत चौधरी, सुरेश पोपट चौधरी , विजय रमेश चौधरी, बापु दगडु माळी, नामदेव पाटील हे पार पाडत आहेत.

बालाजी महाराजांची आरती –

रथावर आरूढ बालाजी महाराजांना आरती दाखविणे, भाविकांच्या आरीतीच्या ताटात प्रसाद देणे आदी पौराहित्य काशीनाथ बयाणी यांचे नंतर १९४० ते १९७३ दरम्यान वासुदेव बाबा बयाणी, राजाभाऊ नागराज यांनी केले. काही वर्ष भैय्याजी अग्निहोत्री यांनी काम पाहीले. १९७३ नंतर रमेश शास्त्री बयाणी, नारायण बयाणी, बळवंत जोशी यांनी जबाबदारी पार पाडली. २००६ पासून महेश बयाणी, विनोद बयाणी, संजय बयाणी, सुनिल जोशी हे जबाबदारी पार पाडत आहेत.

रथ सजावट –

रथ नदीवर धुवायला नेणे, त्याची रंगरंगोटी, तेलपाणी, फुलांच्या माळांनी, विद्दूत रोषणाईने सजविण्याचे काम सुरवातीपासून बरडीवरील रहिवासी लोकांकडे आहे. यात भागवत पवार, गोविंदा खैरे, माधव वराडे, भागवत ढाके हे प्रमुख आहेत.

सायंकाळी मार्गक्रमण करणारा रथ रात्रभर शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरुन पहाटे रेणूका देवीचे मंदिराजवळ आपल्या नियोजित स्थळी परतणार आहे.

या प्रसंगी रथोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, सदस्य.. शिरीष देशमुख, श्रीहरी कवडीवाले, दगडू मंदवाडे, पुंजो पाटील, महेश बडगुजर, जगदीश देवरे, राजेंद्र निकुंभ, सुनिल भोईटे, अभय महाजन, काशिनाथ बारी यासह भाविकांची उपस्थिती होती.

चोख पोलीस बंदोबस्त – 

याप्रसंगी यावलचे आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठान, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण, सहाय्यक फौजदार असलम खान यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोखपणे पार पाडला.

Exit mobile version