Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात कोरोना रुग्णांसाठी बहिणाबाई विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरू…!

जळगाव प्रतिनिधी । शासन आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन कोविड रुग्णांसाठी मोठ्या धाडसाने विनामूल्य केअर सेंटर सुरू होत आहे, तरुण मंडळी हे अनमोल तसेच इतिहासात नोंद होईल, असे कार्य असून सर्व पदाधिकारी मंडळी कौतुकास पात्र आहे असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी काढले. शासकीय तंत्र निकेतन येथे बहिणाबाई कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यात महाभयानक कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना रुग्णांची गरज लक्षात घेता शहरातील ” लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोक संघर्ष मोर्चा ” यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून बहिणाबाई कोविड केअर सेंटर कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यात कोरोना या महामारीचा प्रकोप लक्षात घेता जनतेच्या सेवेसाठी ” लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि लोक संघर्ष मोर्चा ” यांच्या संयुक्त विद्यमाने कोणतेही मूल्य न घेता सदर कोविड केअर सेंटर आज संध्याकाळी रुग्णसेवेत दाखल झाले. या कोविड केअर सेंटरचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते झाले. शासकीय तंत्र निकेतन वसतीगृह (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) , जळगाव येथे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापालिकचे आयुक्त सतीश कुलकर्णी , शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि लोकसंघर्ष मोर्चाचे प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे , युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन कोल्हे , आमदार राजुमामा भोळे, यांची उपस्थिती होती.. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर करीम सालार, उद्योजक के.सी.पाटील , लेवा पाटीदार सोशल व स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अभिजित महाजन, (आर्किटेक्ट ) सामाजिक कार्यकर्ते , कलावंत व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे , डॉ. जयेश खडके , संदीप पाटील , राजेश पाटील , महेश चौधरी , व्यावसायिक चंदन अत्तरदे ,भरत कार्डिले ,सचिन धांडे ,महापालिकेचे अभियंता डी.एस.खडके , सुशील साळुंखे , दीपक सुर्यवंशी , विकास देशमुख ,हितेंद्र धांडे , पुष्कर नेहते , भूषण बढे ,व्यावसायिक जीवन येवले ,चंद्रकांत महाजन , मनपाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र पाटील , एस.एस.पाटील , अमोल धांडे , बंटी भारंबे , गौरव राणे लिलाधर खडके ,सिंचन सरोदे यांचीही उपस्थिती होती.

या कोविड सेंटरमध्ये 126 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळप्रसंगी ( इमर्जन्सी ) रुग्णाला जर ऑक्सिजनची आवश्यकता भासलीस तर ऑक्सिजन किटही उपलब्ध असणार आहे. रुग्णांसाठी या ठिकाणी औषधी, चहा , प्रोटिनयुक्त नाश्ता , जेवणाची विनामूल्य व्यवस्था या सेंटरतर्फे विनामूल्य तसेच निस्वार्थ भावनेने करण्यात आली आहे. आज सर्वसामान्य , गरीब रुग्णांचे पैशाअभावी त्यांना योग्य उपचार घेता येत नाही , काही रुग्ण काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या लुबाडले जातात ,त्यांना एक हक्काचे दालन म्हणजे हे बहिणाबाई कोविड केअर सेंटर असल्याचे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी केले.

या समाजाभिमुख उपक्रमाला माजी उपमहापौर करीम सालार , राष्ट्रवादीचे नेते गफ्फारभाई मलिक , उद्योजक के.सी.पाटील यांनी शुभेच्छा देऊन आयोजकांना सहकार्य करण्याचा शब्द दिला.शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आणि आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही आवश्यक ते सहकार्य करण्याचे सांगितले आहे. हे कोविड सेंटर नक्कीच एक वेगळे आणि आदर्श सेंटर असेल अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्यात. चंदन कोल्हे , सचिन धांडे आणि सर्व युवा टीमचे जिल्हाधिकारी डॉ.राऊत आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला , असे गौरवोद्गार काढले.

या कोविड केअर सेंटरमध्ये डॉ.अनुजा पाटील , डॉ.सौरभ इंगोले , डॉ.अनघा पाटील यांच्यासह इतर तीन डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करणार असून काळजी घेणार आहेत. उदघाटन कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी कोविड केअर सेंटरच्या विविध विभागाची पाहणी केली आणि जिल्हाधिकारी व आयुक्तांनी विविध सूचनाही अधिकारी , कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन कोविड सेंटरचे जनसंपर्क व प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी केले तर आभार अभिजित महाजन यांनी मानले .या आगळ्यावेगळ्या समारंभाला शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक , सामाजिक चळवळीत कार्य करणारे व्यक्ती आवर्जून उपस्थित होते.

 

Exit mobile version