Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहिणाबाईंच्या जन्मभूमिचा लोकप्रतिनिधी असल्याचा सार्थ अभिमान : ना.पाटील ( Video )

जळगाव प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरीनी जन्म घेतलेल्या भूमीचा (आसोदा) मी लोकप्रतिनिधी व जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी कवियत्री बहिणाबाईंच्या जयंती निमित्त व्यक्त केले. आसोदा येथील बहिणाबाईंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते उपस्थितांशी बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज सकाळी आसोदा गावातील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर उपस्थितांशी संवाद साधतांना ना. पाटील म्हणाले की, बोली भाषेतील बहिणाबाईंच्या कविता, गाणी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहेत. निसर्ग, शेतकरी, शेती, स्त्रियांच्या व्यथा, विनोद, अध्यात्म अशा सर्व विषयांना त्यांनी कवितेतून जगासमोर मांडले. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाज सुधारक होत्या.असेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.

ना. पाटील पुढे म्हणाले की, बहिणाबाईंची जन्मभूमि असणारे आसोदा गाव हे माझ्या मतदारसंघातील असून याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण मंत्री झालो आणि या कामाला गती देणार तोच कोरोनाची आपत्ती आली. आणि अर्थातच आर्थिक तरतुदीलाही मर्यादा आल्या आहेत. तथापि, आपण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी दोन कोटी रूपयांची तरतूद केली असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आसोदेकरांना दिलेल्या कामातील आश्‍वासनांपैकी अनेक कामे पूर्ण झाले असून काहींची कामे सुरू आहेत. गावासाठी आपण नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. ती लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली. या कार्यक्रमानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी भादली गावाकडे जाणार्‍या चौकातील काम हे वाढवून घेण्याच्या कंत्रादाराला सूचना केल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच श्रीमती नबाबाई बिर्‍हाडे, तुषार महाजन बहिणाबाई स्मारक समिती अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य संजीव पाटील, योगेश वाणी, रविकांत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन, संजय भोळे, खेमचंद महाजन,संजय बिर्‍हाडे,सुभाष महाजन,सचिन चौधरी,रमाकांत कदम,उमेश बाविस्कर,जितेंद्र भोळे तसेच बहिणाबाई महिला मंडळाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खालील व्हिडीओत पहा बहिणाबाई जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रम व ना. गुलाबराव पाटील यांचे मनोगत.

Exit mobile version