Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बबनराव लोणीकरांच्या धमकीची क्लीप व्हायरल 

औरंगाबाद– बंगल्यातील वीज खंडित केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना तंबी देतानाचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तर हा ऑडिओ बनावट, खोटा असून, मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा लोणीकर यांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये आमदार लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला तंबी देताना थेट प्राप्तिकर खात्याच्या धाडी टाकण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट होते. ‘जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याला तीन तास कोंडून ठेवले होते. तुलाही निलंबित करू शकतो, एका मिनिटात घरी पाठवू शकतो. तुमच्यात हिम्मत असेल तर झोपडपट्टी भागात आणि आकडे टाकून वीज घेणाऱ्या नागरिकांच्या वसाहतीत जाऊन कारवाई करून दाखवा. साताऱ्यात ५० टक्के आकडे आहेत. तिथे कारवाई करण्याची मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांची हिंमत नाही. माझी घरावर कारवाई करायची असतीस तर सात दिवसांची नोटीस द्यायला हवी. ३५ वर्षापासून राजकारणात आहे, तीस वर्षापासून आमदार आहे. आम्ही नियम कायदे पाळतो,’ असे ते या क्लीपमध्ये म्हणत आहेत.

या प्रकारानंतर लोणीकर म्हणाले, ‘मी कोणत्याही प्रकारचा फोन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नाही किंवा माझे कुठलेही मीटर महावितरणने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल केले आहे. व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड आहे.’

Exit mobile version