Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बी.जी. कोळसे-पाटील वंचित आघाडीतून बाहेर

मुंबई प्रतिनिधी । माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी वंचित आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी स्वत:च फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याची घोषणा केली.

वंचित आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या नावाला एमआयएमतर्फे विरोध सुरू झाला होता. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ही जागा एमआयएमला सोडण्याचे निश्‍चीत केले असून येथून या पक्षाचे आमदार इम्तीयाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोळसे पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी आज एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून वंचित आघाडीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मोदी-शहा विरोधात आपण घेतलेल्या भुमिकेला वंचित आघाडी तडा देत असल्याची खात्री पटल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की, प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून अनेकदा मला काँग्रेससोबत चर्चा करण्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्यांच्यात मध्यस्थीसाठी मी कालपर्यंत प्रयत्न केले. मात्र, परवाच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी वंचित विकास आघाडीचे सर्व उमेदवार जाहिर करुन चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे माझा जर या आघाडीला पाठींबा राहिला तर माझी अप्रत्यक्षपणे मोदीला मदत झाली असती आणि असं झालं असतं तर मी कधीच स्वतःला माफ करु शकलो नसतो. कारण कुणाचीही हिंमत नसताना मी मोदी-शाह व संघमुक्त भारताची घोषणा केली होती, असे न्या. कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version