सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नरेंद्र पाटील जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामनेर ता.पाचोरा येथील नरेंद्र शिवाजी पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची शासन स्तरावर दखल घेत त्यांना दि. १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा “जिल्हा युवा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

नरेंद्र पाटील यांनी समुदाय विकासाच्या कृषी, पर्यावरण, शिक्षण, वने, सांस्कृतिक यासह समुदाय विकासाच्या विविध स्तरावर काम करत असतांना जलसंपदा, वनसंपदा, भूसंपदा, गोसंपदा, जैवसंपदा, उर्जासंपदा, आणि जनसंपदा या ग्रामसंजीवणीस पूरक ठरणाऱ्या सप्तसंपदांच्या शाश्वत विकासासाठी व्यासंग जोपासला असून त्यासाठी अव्याहतपणे त्यांचे काम चालू आहे. सातत्याने वृक्ष लागवड, जल संवर्धन, पर्यावरण सजगता, सेंद्रिय शेती, जैवविविधता या संदर्भात जाणीव जागृती घडवून आणत काम केले आहे.

त्यांच्या ग्रामोद्धसरास बळ देणाऱ्या या कार्याची दखल घेत त्यांना दि. १ मे महाराष्ट्र दिनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत “जिल्हा युवा पुरस्कार ” राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांची उपस्थिती होती. त्यांच्या या सन्मानानिमित्त त्यांचे कृषिभूषण सागर धनाड यांनी त्यांचे अभिनंदन करत भावी गतीविधिस सदिच्छा दिल्यात. तसेच प्रसिद्ध उद्योजक जे.आर.आमले, प्रमोद पुराणिक, सामनेर ग्रामस्थ व सामनेर परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.

कुणी चांगले म्हणावे म्हणून काम न करता आपण केलेल्या कामामुळे अनेकांचे भले होत असेल तर ते काम सोडूच नये या सिद्धांतावर काम चालू असून ते यापुढे अधिक वेगाने सुरू राहील. असे जिल्हा युवा पुरस्कारार्थी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Protected Content