Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेडक्रॉस जळगाव शाखेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार प्रदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेडक्रॉस राज्य शाखा मुंबईच्या वतीने रेडक्रॉस जळगाव शाखेला सन 2021- 22 च्या कार्यकाळात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी देण्यात येणारा राजा महाराजा सिंह सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार तसेच सन 2022- 23 च्या कार्यकाळात रेडक्रॉसच्या सेवाकार्यात सर्वात जास्त नवीन सभासदांना सहभागी करण्यासाठीचा रेडक्रॉस राज्य शाखेचा मेरिट पुरस्कार देऊन जळगाव रेडक्रॉस शाखेला गौरविण्यात आले.
रेडक्रॉस राज्य शाखा मुंबई यांच्या यांच्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये हे फिरता चषक,स्मृतीचिन्ह आणि सन्मान पत्र हे राज्य शाखेचे राज्य चेअरमन खुसरो खान, व्हाईस चेअरमन सुरेश देवरा, कोषाध्यक्ष मिली गोलवाला, जनरल सेक्रेटरी टी.बी. सकलोथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व रेडक्रॉस जिल्हा शाखा व तालुका शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रेडक्रॉस जळगाव शाखेच्या वतीने रेडक्रॉसचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. किशोरराजे निंबाळकर, उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेअरमन  विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष सांखला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा रेडक्रॉस राज्य शाखेचे अध्यक्ष महामहीम श्री. रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले. समाजसेवेचे ब्रीद अंगीकारून रेडक्रॉस जळगाव शाखा गेल्या 70 वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला सेवा देत आहे. या सर्व सेवा उपक्रमांसाठी माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शन आणि रेडक्रॉसचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व सभासद, कर्मचारी, स्वयंसेवक व जळगावकर नागरिकांचे बहुमोल सहकार्य मिळत असते. महाराष्ट्रातील रेडक्रॉस सोसायटीच्या असलेल्या 33 शाखांमध्ये जळगाव जिल्हा रेडक्रॉस शाखेला हा सन्मान मिळाला आहे. माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. रेडक्रॉसच्या पदाधिकार्यां नी हा सन्मान सर्व रक्तदान शिबीर आयोजक, सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सर्व सेवार्थी जळगावकर नागरिकांना समर्पित केला आहे.

Exit mobile version