Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपवर हल्ले करा…आपल्या पक्षावर नाही : कपिल सिब्बल यांनी सुनावले !

नवी दिल्ली । काँग्रेस मधील अंतर्गत कलह अद्याप शमला नसून आज जितीन प्रसाद यांची बाजू घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा तिखट भाष्य केले आहे.

काँग्रेसमध्ये पक्षनेतृत्वावरून निर्माण झालेलं संकट तूर्तास शमलं असलं, तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद अजूनही सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते जितीन प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेशातील जिल्हा काँग्रेसनं मंजूर केल्यानं कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सहकारी जितीन प्रसाद यांची बाजू घेत पक्षातील अंतर्गत कलहावरून नेत्यांना सुनावलं आहे. काँग्रेसला भाजपावर हल्ले करण्याची गरज आहे, स्वतःच्या पक्षावरच नाही, अशा शब्दात सिब्बल यांनी संताप व्यक्त केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या २३ नेत्यांमध्ये कपिल सिब्बल व जितीन प्रसार यांचाही समावेश होता. प्रसाद यांची या पत्रावर स्वाक्षरी असून, ते काँग्रेस कार्यसमितीचे विशेष आमंत्रित सदस्यही आहेत.
प्रसाद यांच्याविरुद्ध मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर सिब्बल यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या नेत्यांविरुद्ध उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हा कांग्रेसनं पाच ठराव मंजूर केले आहेत. यातील एक ठराव जितीन प्रसाद यांच्याबद्दलही आहे. पत्र लिहिल्या प्रकरणी प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठरावही मंजूर केला आहे.

Exit mobile version