Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारात गंडवले!

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकऱ्याला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने एटीएम कार्ड बदलवून परस्पर ३६ हजार रुपये काढून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “ तालुक्यातील पिंप्री येथे सतीश दगडू चव्हाण (वय- ४४) परिवारासह वास्तव्यास असून ते शेती व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी हाकत आहेत. शेती हि आईच्या नावावर असल्याने शेती कर्जासाठी जेडीसीसी बँक शाखा गणपूर येथे आईच्या नावाने खात उघडण्यात आलं आहे. त्यात पीक कर्जाचे ४०,००० रुपये पडून होते. त्यापैकी चव्हाण यांनी १० हजार रुपये अलिकडेच कामानिमित्त काढले होते. त्यानंतर खात्यात ३६,००० रुपये बाकी होते.

उर्वरित रक्कम काढण्यासाठी सतीश चव्हाण बुधवार, दि.१८ मे रोजी दुपारी चाळीसगाव येथे भडगाव रोडवरील एसबीआय बँक एटीएमवर पैसे काढायला आले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पैसे निघाले नाही. तेवढ्यात पाठीमागील अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या तरुणाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चव्हाण कडून एटीएम कार्ड घेत पिन नंबर टाकायला लावला. तरीही पैसे मशीन बाहेर आले नाही. म्हणून तो तरुण आपल्याजवळील ब्लॉक एटीएम कार्ड चव्हाणांच्या हातात देऊन तो निघून गेला.

त्यानंतर शुक्रवार, दि.२० मे रोजी चव्हाण हे पुन्हा पैसे काढायला आले तेव्हा सदर कार्ड ब्लॉक असल्याचे कळाले. बँकेच्या शाखेला भेट देऊन चौकशी केली असता सदर कार्ड अलकाबाई नारायण पाटील या नावाचे निघाले. चव्हाणांनी खात्यातील पैशाची खात्री केली. तर खात्यातील ३६,००० रुपये अज्ञाताने काढलेले दिसून आले. त्याचवेळी सतीश चव्हाण यांना धक्का बसला आणि बुधवार, दि.१८ मे रोजी त्या तरुणानेच आपली फसवणूक केल्याची त्यांची खात्री झाली.

त्यानंतर सोमवार, दि.२३ मे रोजी सतीश चव्हाण यांनी रात्री चाळीसगाव पोलीस स्थानक गाठून यांनी भादंवि कलम- ४२० प्रमाणे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी अशा फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोना दीपक पाटील हे करीत आहे.

Exit mobile version