रिधूर येथे तरूणीने घेतला गळफास; कारण अस्पष्ट

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रिधुर येथील मामाच्या गावाला आलेल्या १८ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज पहाटे उघडकीला आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नंदीणी कडू तायडे रा. १८ रा. अट्रावल ता. यावल असे मयत तरूणीचे नाव आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल येथे नंदीणी हे आई वडीलांसह वास्तव्यास होती. काल बुधवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील रिधूर येथे मामा मनोहर कोळी यांच्या ती घरी आली होती. रात्री जेवणानंतर सर्व जण झोपल्यानंतर छताला मध्यरात्री नंदीणी हिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. मनोहर कोळी यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास जाग आली असता, नंदीणी हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती कळाल्यावर पोलीस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. तसेच प्रकाराची माहिती तालुका पोलिसांना कळविली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, पोलीस नाईक, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान नंदीनी हिने आत्महत्या का केली हे कळू शकलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस पाटील प्रमोद पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.

 

Protected Content