लसींच्या तुटवड्याला मोदीच जबाबदार-ओवैसी

नवी दिल्ली– कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना लसींचा तुटवडा निर्माण झाला असून याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार असल्याचा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी करून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

देशातील कोरोनाची रूग्णसंख्या वाढली असून मृत्यूचे प्रमाण देखील लक्षणीयरित्या वाढले आहे. कोरोनावर लस हेच परिणामकारक आयुध असतांनाही याची उपलब्धता नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सर्व सुरू असतांनाच केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर ओवेसी यांनी टीका केली आहे. या आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत असं म्हटलं आहे. तसेच हा धोरण लकवा असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. जोपर्यंत आपण भारतातील लोकांचं लसीकरण पूर्ण करत नाही, तोपर्यंत लोकांचे जीव वाचवू शकत नाही, असं सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत. हे करायचं असेल तर मोदी सरकारला हे निश्‍चित करावं लागेल की, प्रत्येक महिन्याला ३०० मिलियन डोस दिले जातील आणि लोकांचं लसीकरण केलं जाईल. पण ते यात अपयशी ठरले आहेत असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Protected Content