Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारने विवेक बुध्दी गहाण ठेवली आहे का ? : आशिष शेलारांचा सवाल

मुंबई वृत्तसंस्था । नौदलातील निवृत्त अधिकार्‍याला मारहाण केल्या प्रकरणी शिवसैनिकांची तात्काळ सुटका झाल्यानंतर आशिष शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडत सरकारने विवेक बुध्दी गहाण ठेवली आहे का ? असा सवाल केला आहे.

अलीकडेच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात शेलार यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणार्‍यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असं शेलार यांनी म्हटलं आहे.

तर, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. हे निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस यांनी ही तर राज्यपुरस्कृत दहशत असल्याचा टोलाही शिवसेनेला लगावला. महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकार्‍याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version