Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एनडीएला बहूमत मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांने कालीमातेला स्वत:ची बोटे केली दान

बलरामपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळताच भाजपाच्या कार्यकर्त्याने गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन बळी देत स्वत:ची बोटे दान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गेश पांडे असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. ४ जून रोजी छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये ही घटना घडली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुरुवातीला काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. इंडिया आघाडी सरकार बनवणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे निराश झालेल्या दुर्गेश पांडे यांनी गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाचा विजय व्हावा, यासाठी प्रार्थना केली होती. पुढे काही तासांनंतर संपूर्ण निकाल जाहीर झाला, तेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले होते. त्यामुळे देवीने आपली प्रार्थना ऐकली, या भावनेतून दुर्गेश पांडे याने पुन्हा मंदिरात जाऊन आपल्या डाव्या हाताची बोटे छाटत देवीला दान दिली.

दुर्गेशने बोटे छाटताच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यावेळी स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, जखमी मोठी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबिकापूरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्या उपचार केले. मात्र, तुटलेली बोटं जोडण्यात डॉक्टरांना यश आले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेशची प्रकृती सध्या ठीक आहे. यासंदर्भात बोलताना दुर्देश पांडे म्हणाला, ज्यावेळी काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, त्यावेळी मला नैराश्य आले होते. त्यामुळे मी गावातील काली मातेच्या मंदिरात जाऊन भाजपाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. संध्याकाळी जेव्हा भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी पुन्हा देवीच्या मंदिरात गेलो आणि माझी बोटे छाटत मी देवीला दान दिले.

पुढे बोलताना त्याने भाजपाला ४०० जागा न मिळाल्याबाबतही प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला आता बहुमत मिळाले आहे. ते आता सरकारही स्थापन करतील. मात्र, भाजपा ४०० जागा मिळू शकल्या नाहीत, त्याचं दु:ख आहे. जर भाजपाने ४०० जागा जिंकल्या असत्या, तर मला आनंद झाला असता, असे तो म्हणाला. दरम्यान, यंदा लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपाला ५४३ पैकी २३४ जागा मिळाल्या. तर मित्र पक्षाच्या जागा मिळून एनडीएने २९३ पर्यंत मजल मारली. उद्या (९ जून रोजी) नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

Exit mobile version