Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिबट्याची आर्त हाक…मानवी हस्तक्षेपाने केला घात !

चाळीसगाव दिलीप घोरपडे । चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात अलीकडेच बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. याबाबत चौकशीचे सोपस्कार पार पडून त्याच्या मृत्यूबाबत काही तरी कारण समोर येईल. मात्र खरं तर मानवी हस्तक्षेपामुळेच या बिबट्याचा बळी गेल्याचे दिसून येत आहे. याबाबत दिलीप घोरपडे यांचा थोडा हटके वृत्तांत.

दिनांक ११ मार्च सोमवार रोजी चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात सुपडू देवराम पाटील यांच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला शेताच्या बांधावर बिबट्या बघून पहिल्यांदा पाहणारा शेतकरी प्रचंड घाबरून पळत सुटला. त्याने येथील उपसरपंच सुनील पवार यांना शेतात बिबट्या असल्याचे सांगितले सुनिल पवार यांनी वन विभागाचे वनक्षेत्रपाल संजय मोरे यांना ही हकीकत फोनवरून सांगितली त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे आणि वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले व पाहणी केली असता बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्याच्या मृत्यूची वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. यातून काय निष्कर्ष निघेल तर निघो…मात्र या बिबट्याने आत्महत्या केल्याचे अदृश्य पत्र मला पाहावयास मिळाले. या पत्रात हा चार वर्षीय बिबट्या अत्यंत दुःखी होऊन लिहितोय की मला कोणी मारले नसून मी आत्महत्या केली आहे. आज माझ्या अधिवास असलेल्या भागात तुम्ही माणसांनी मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे मी खात असलेले अन्न देखील आता तुम्ही खाऊ लागले. जंगलात आमच्यासाठी असलेले पाणी वेगवेगळ्या बोअरवेल्स करून तुम्ही पळू लागलेत. यामुळे आमच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आमची मुक्त संचार करण्याची जागा तुम्ही उद्योग आणि रहिवासाचे घरे उभारुन गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. तुमच्या वाहनांचे आणि कारखान्यांचे कर्कश आवाज सोलर पॉवर सारख्या प्रचंड आग ओकणार्‍या उद्योगामुळे आमचे स्वास्थ आणि शांतता आता धोक्यात आली आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये तुमच्या या संपूर्ण त्रासाने आम्ही मेल्याशिवाय मुळीच राहणार नाही मग तुमच्या हाताने छळ वादातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी असा विचार माझ्या मनात आला आणि मी आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येचं खापर कुणा शेतकर्‍यावर अजिबात फोडू नये. तो बिचारा देखील आज मोठ्या संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळ व नापिकीमुळे तो आज मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जो शेतकरी स्वतः आत्महत्या करून मरतोय तो मला काय मारेल ? शेतकर्‍यांनी कधीच माझे नुकसान केले नाही उलट आम्हाला पूरक असे वातावरण त्यांनी नेहमी तयार केले आहे. म्हणून कुठल्याही गरीब शेतकर्‍याला दोषी न धरता तुम्ही मानव आत्मचिंतन करा. तुम्ही करत असलेल्या हस्तक्षेपाचा, आमच्या रहिवासातील शिरकावाचा आणि आमचे अन्न आणि पाणी नष्ट करीत असल्याचा मी बळी आहे हे समजून घ्या. शक्य झाल्यास आमच्या अधिवासातील शिरगाव कमी करा जेणेकरून माझे राहिलेले बांधव तरी सुखरूप राहतील.

मित्रांनो आपल्याला मी प्रतिकात्मक रूपाने बिबट्याच्या वेदना सांगितल्या. यावर उपाय करणे भलेही एकाच्या हातात नसेल. मात्र आपण सर्वांनी यावर विचार करण्याची गरज आहे.

Exit mobile version